पावसात जाऊन भिजायचं!
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं!
आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील
ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे
असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!
म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
No comments:
Post a Comment